लॉजवर थांबलेल्या सराफा व्यापाऱ्याची पोलिसांकडून लूट; पीएसआय गजानन क्षीरसागर सहित पथकावर गंभीर आरोप
पोलीस महानगर नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सलग समोर येणाऱ्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बीड पोलिस प्रशासनावर आणखी एक गंभीर ठपका ठेवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील सराफा व्यावसायिकाला चक्क पोलीस अधिकारी आणि त्यांच्या साथीदारांनीच लुटल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात घडला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातली कायदा-सुव्यवस्थेची भूमीका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
घटनेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्याकडून ४ लाख रुपये बळजबरीने घेऊन, त्याला संपूर्ण रात्र एका वेगळ्या लॉजमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
🔴 घडले तरी काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे सोने-चांदी व्यवहाराच्या कामानिमित्त 24 नोव्हेंबर रोजी बीड शहरात आले होते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी शहरातील विशाल लॉज येथे मुक्काम केला. रात्री उशिरा अचानक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पीएसआय क्षीरसागर आणि काही पोलीस कर्मचारी त्यांच्या खोलीत घुसल्याचे सांगितले जाते.
व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी कोणतीही चौकशी किंवा स्पष्ट कारण न देता त्यांच्या बॅगची तपासणी केली आणि त्यातून ४ लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर व्यापाऱ्याला जवळच्याच दुसऱ्या लॉजवर नेऊन रात्रभर डांबून ठेवण्यात आले, अशी माहिती तक्रारीत नमूद केली आहे.
🔴 सकाळी केली थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
रात्रभराच्या त्रासानंतर सकाळी व्यापाऱ्याला सोडण्यात आले. मुक्त होताच त्यांनी तत्काळ बीडचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आणि संपूर्ण प्रकाराची तक्रार नोंदवली. पोलिसांकडूनच लूट आणि बंदीचा प्रकार घडल्याने एसपी कार्यालयातही मोठी खळबळ उडाली.
🔴 पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणाने तर थेट पोलीस अधिकाऱ्यानेच व्यापाऱ्याला लुटल्याचा आरोप झाल्याने पोलिसांवरील विश्वासार्हतेला मोठी तडा गेल्याची चर्चा सर्वत्र आहे.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्याची मागणी स्थानिक व्यापारी व नागरिकांकडून होत आहे. आरोपी पीएसआय आणि इतर संबंधित पोलिसांवर निलंबन व कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.