महाबळेश्वरात ‘अंबरग्रीस’ तस्करीचा पर्दाफाश; व्हेल माशाच्या उलटीसह सात जण ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
सातारा : महाबळेश्वर वन विभागाने वेण्णा लेक परिसरात कारवाई करत व्हेल माशाची सुमारे ५ किलो ३०० ग्रॅम ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त केली असून या प्रकरणी मुंबई, ठाणे, पुणे आणि मालवण येथील सात तस्करांना ताब्यात घेतले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पदार्थाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे महाबळेश्वर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वेण्णा तलाव आणि मेटतळे परिसरात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. वन विभागाच्या पथकाने तीन वाहनांची तपासणी केली असता त्यापैकी एका वाहनातून अंबरग्रीस आढळून आले. जप्त केलेल्या पदार्थाचे वजन सुमारे ५ किलो ३०० ग्रॅम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी हितेंद्र मनोहर शेट्ये, अतुल अशोक विश्वासराव, मोहन हरिभाऊ पाटील, आकाश शामसुंदर धुरी, एक्झम क्लेमेंट फर्नांडिस, विल्सन झुजे फर्नांडिस आणि कौस्तुभ मिलिंद प्रभू या सात जणांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अंबरग्रीस हा कायद्यानुसार अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असलेला संरक्षित घटक असून त्याची खरेदी-विक्री किंवा अवैध वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
या कारवाईत महादेव मोहिते(वनपरिक्षेत्र अधिकारी) यांच्यासह गणेश महांगडे, सुनील लांडगे, तुकाराम निकम, बाबू मराठे, देवेंद्र पवार आणि अविनाश गवळी यांच्या पथकाने सहभाग घेतला. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.