भाऊ मानून जवळीक; काशी विश्वनाथला नेऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा दबाव ठेऊन २ लाखांची खंडणी, महिलेविरुद्ध गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – भाऊ मानत असल्याचा खोटा देखावा करून जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न, काशी विश्वनाथ येथे नेऊन तीन दिवस बळजबरी, त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपयांची खंडणी मागितली असा धक्कादायक प्रकार चंदगड येथील ४७ वर्षीय पुरुषाच्या बाबतीत घडल्याची तक्रार कोथरुड पोलिसांत दाखल झाली आहे. तक्रारीनुसार, पुण्यातील एका ४२ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार ३ मार्च ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
🔴 कशी झाली ओळख?
फिर्यादी कुटुंबीयांसह ७ नोव्हेंबर २०२४ रोजी तुळजापूरला देवीदर्शनासाठी गेले असताना या महिलेची ओळख झाली. त्या ओळखीचा फायदा घेत तिने चंदगड येथील त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू केले. फिर्यादीच्या पत्नीसमोर तो ‘भाऊ’ मानत असल्याचा दावा करून तिच्यासोबत मनमानीपणे फिरण्यास भाग पाडले. स्वतःची ओळख हायकोर्टातील वकील म्हणून करून देत ‘मोठ्या लोकांची ओळख आहे’ असेही तिने सांगितले.
🔴 काशी विश्वनाथ यात्रेदरम्यान बळजबरीचे प्रकार
महिलेने पुण्यावरून फोन करून फिर्यादीला काशी विश्वनाथ यात्रेसाठी पाठविण्याची विनंती फिर्यादीच्या पत्नीला केली. फिर्यादी २५ फेब्रुवारीला पुण्यात पोहोचले असता, ती दोघेच विमानाने काशीला जाऊ, असे सांगून त्यांना आपल्या घरी थांबवले. त्यानंतर काहीतरी प्यायला देऊन त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची नोंद आहे. विरोध करताच ‘जर इथून गेलात तर काहीतरी करीन’ अशी धमकी देण्यात आली.
काशी विश्वनाथ येथे तिने फिर्यादीला तीन दिवस आपल्याबरोबर ठेवत मानसिक दडपण निर्माण केले. पंडितांच्या माध्यमातून ‘शनी आहे, सोन्याची अंगठी घालावी लागेल’ असा बहाणा करत दबाव आणण्यात आल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे.
🔴 पुण्यात परतल्यावर धमक्या आणि खंडणीची मागणी
पुण्यात परतल्यावर कर्वे रोडवरील ज्वेलर्स दुकानातून सोन्याची अंगठी खरेदी करून देण्यास तिने भाग पाडले. त्यानंतर “जे काही झाले आहे ते उघड केले तर बदनामी करेन, माझ्याशी लग्न कर नाही तर २ लाख रुपये दे” अशी धमकी देण्यात आली. पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली गेली. फिर्यादीने हा संपूर्ण प्रकार पत्नीला सांगितल्यानंतर दोघांनीही तिला दिलेल्या वस्तू कोल्हापूर येथे परत केल्या. त्यानंतरही महिलेने दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करून शिवीगाळ केली आणि पुन्हा २ लाखांची मागणी करत फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
रागाच्या भरात तिने फिर्यादीविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली; मात्र पोलिस चौकशीदरम्यान संपूर्ण प्रकार उघड झाला. कोथरुड पोलिस ठाण्यात या महिलेविरुद्ध खंडणी, धमकी तसेच बळजबरीचे गुन्हे नोंदवले असून पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख पुढील तपास करत आहेत.