गर्भवती महिलेला रुग्णवाहिका चालकाने जंगलात अर्ध्यावर सोडले; नवजात बाळासह २ किमी पायपीट
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात गर्भवती महिलेला रुग्णवाहिका चालकाने निर्जन जंगलात अर्ध्यावरच उतरवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवजात बालकासह प्रसूत महिलेला तिच्या आई आणि सासूबाईंनी मिळून दोन किलोमीटर पायपीट करत घरी जावे लागले.
आमला गावातील सविता बांबरे यांची प्रसूती जव्हार कुटीर रुग्णालयात झाली होती. २४ नोव्हेंबरला त्यांना रुग्णवाहिकेतून घरी पाठवण्यात आले. मात्र चालकाने गावापूर्वीच घनदाट जंगलात कुटुंबाला उतरवून रुग्णवाहिका निघून गेली. त्या भागात बिबट्यांचा वावर वाढलेला असताना अशा प्रकारे प्रसूत महिला आणि बालकाला सोडून देणे संतापजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
घटनेची जोरदार दखल घेत स्थानिकांनी संबंधित रुग्णवाहिका चालकावर कारवाईची मागणी केली आहे.