मुंबईत दिंडोशीमध्ये बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीती, तातडीच्या उपाययोजनांची मागणी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईच्या दिंडोशी परिसरातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झाल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री उशिरा बिबट्या सोसायटीत शिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागात सुरू असलेल्या बिबट्यांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतही त्याचे दर्शन झाल्याने चिंता वाढली आहे. याबाबत आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून संभाव्य हल्ले टाळण्यासाठी तातडीच्या सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी या भागात सहा फूट उंचीच्या संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. तरीही त्या ओलांडून बिबट्याचा प्रवेश होत असल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. मुंबईत बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पूर्वीच्या घटना लक्षात घेता दिंडोशी परिसरात पुन्हा वाढलेल्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाकडून अतिरिक्त संरक्षणात्मक उपायांची अपेक्षा व्यक्त होत आहे.