पुण्यात २२ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून व दगड घालून खून; सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे धक्कादायक घटना

Spread the love

पुण्यात २२ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून व दगड घालून खून; सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे धक्कादायक घटना

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आणखी एक कलंक लावणारी घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात उघडकीस आली आहे. मीनाक्षीपुरम येथील कृष्णकुंज सोसायटीच्या पार्किंगमध्ये सोमवारी दुपारी एका २२ वर्षीय तरुणाचा टोळक्याने निर्घृण खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ताौफीर रफीक शेख (वय २२, रा. कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुपारी अडीचच्या सुमारास पाच जणांचे टोळके हातात कोयते घेऊन पार्किंगमध्ये धडकले. त्यांनी तौफीरवर सपासप कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तो जमिनीवर कोसळताच आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तौफीर सोमवारी काही कारणाने वडगाव बुद्रुक येथील कृष्णकुंज इमारतीजवळ थांबला होता. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात दहशत पसरली असून रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

प्रथमदर्शनी हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्यात सहभागी संशयितांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon