ठाण्यात १०० कोटींचा गुंतवणूक घोटाळा उघड; ९ जणांवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कमी कालावधीत जादा परताव्याचे अमिष दाखवून तब्बल २०० गुंतवणूकदारांची सुमारे १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात एकूण नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे मुंबईतील भांडूप येथील रहिवासी असून त्यांची ओळख एका अर्थपुरवठा करणाऱ्या दलालाशी होती. हा दलाल आणि त्याचे सहकारी गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून विविध उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यावर नियमित परतावा देण्यात येईल, अशी बतावणी करीत होते. संबंधित कंपनीचा कार्यालय ठाण्यातील नौपाडा परिसरात आहे.
तक्रारदारांनी २०१६ साली आठ लाख रुपये गुंतवले होते. सुरुवातीची दोन वर्षे त्यांना दरमहा १.५ टक्के व्याजदराने परतावा मिळत होता. मात्र त्यानंतर परतावा अचानक बंद झाला. याबाबत चौकशी केली असता कंपनीची आर्थिक स्थिती डळमळीत असल्याची आणि सध्या पैसे देणे शक्य नसल्याची माहिती दलालांनी दिली.
तक्रारदार वारंवार कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करत असताना अशाच प्रकारे अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले. पुढील माहिती घेतल्यावर तब्बल २०० नागरिकांची अंदाजे १०० कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे समोर आले. यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला.
तक्रारीच्या आधारावर नौपाडा पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.