कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशाली पाटील यांचा दुहेरी गौरव; सामाजिक कार्याला मिळाली राज्यभरातून दाद
पुणे : समाज उत्थान, महिला सक्षमीकरण आणि विविध जनजागृती उपक्रमांत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कुसुमवत्सल्य फाउंडेशन ट्रस्टच्या संस्थापक व अध्यक्षा सौ. वैशाली पाटील यांना एकाच दिवशी दोन मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर राबवलेल्या उपक्रमांमधील नेतृत्वगुण, संवेदनशीलता आणि संकटग्रस्तांसाठी केलेल्या कामाची दखल घेत हा दुहेरी सन्मान घोषित करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
पहिल्या पुरस्कारामध्ये समाजातील वंचित, निराधार, महिलांवरील अत्याचारग्रस्त तसेच अनाथ मुलांसाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेला विशेष मान्यता मिळाली. तर दुसऱ्या पुरस्काराद्वारे महिला सुरक्षा, अँटी-हॅरेसमेंट जनजागृती, शिक्षण व स्वावलंबनासाठी राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.
सन्मान स्वीकारताना सौ. वैशाली पाटील म्हणाल्या, “समाजासाठी चांगलं करण्याची प्रेरणा मला माझ्या लोकांकडूनच मिळते. हा सन्मान माझ्या टीमचा, मार्गदर्शकांचा आणि मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचा आहे. हा गौरव आम्हाला आणखी मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.”
या दुहेरी सन्मानानंतर त्यांच्या सामाजिक कार्याची राज्यभरातून व्यापक दखल घेतली जात असून विविध सामाजिक घटकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.