ठाणे पोलीस आयुक्तालयात तक्रार निवारण दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९२३ अर्जांची तात्काळ निर्गती
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत १५ व १६ नोव्हेंबर रोजी आयोजित तक्रार निवारण दिनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या दोन दिवसीय उपक्रमासाठी एकूण १५०६ अर्जदारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी तब्बल १०६२ अर्जदार प्रत्यक्ष हजर राहिले.
तक्रार निवारण प्रक्रियेसाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. अर्जदारांच्या समक्ष तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी करून तात्काळ निर्गती करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या उपक्रमात ९२३ तक्रारींचे निराकरण जागेवरच करण्यात आले. उर्वरित अर्जदारांनाही लवकरात लवकर बोलावून त्यांच्या शंका व तक्रारींचे निरसन करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली.
अर्जदारांना प्रत्यक्ष बोलावून “जागच्या जागी” तक्रार निवारण केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ठाणे शहर पोलिसांविषयी विशेष आभार व्यक्त केले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व जनसंपर्क अधिकारी, शैलेश साळवी,ठाणे शहर पोलीस आयुक्तालय यांनी सांगितले.