कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!
ट्रेनमधून उतरताना जखमी झालेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यूने रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून उतरताना जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून त्यांना घरी पाठवले, मात्र काही तासांतच घरी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. डेव्हिड घाडगे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला असून, संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी संतप्त भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे कल्याणचे रुक्मिणीबाई रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
कल्याण जवळ आंबिवली परिसरात राहणारे डेव्हिड घाडगे हे मुंबईतील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री मुंबईहून कल्याणला परत येत असताना, कल्याण स्टेशनवर ट्रेनमधून उतरताना ते पडून जखमी झाले.जखमी अवस्थेत असलेल्या डेव्हिड यांना त्यांचा मुलगा तुषार याने तातडीने कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी डेव्हिड यांच्यावर प्राथमिक उपचार केले, परंतु त्यांना रुग्णालयात ऍडमिट न करता, फक्त दुसऱ्या दिवशी येऊन एक्स-रे काढण्याचा सल्ला देत घरी जायला सांगितले.
डेव्हिड यांचा मुलगा तुषार याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने डॉक्टरला वारंवार विनंती केली होती की वडिलांना ऍडमिट करून घ्यावे. वडिलांना त्रास होत असतानाही डॉक्टरने त्यांची विनंती ऐकली नाही. तुषारचा आरोप आहे की, “डॉक्टर फक्त गप्पा मारण्यात व्यस्त होते आणि माझ्या वडिलांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी हलगर्जीपणा केला.शनिवारी सकाळी डेव्हिड यांना एक्स-रे साठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे होते. याच दरम्यान घरी असताना त्यांनी लघवी केली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये आणला. डेव्हिड घाडगे यांचा मुलगा तुषार आणि त्यांचे नातेवाईक गौतम मोरे यांनी या घटनेसाठी डॉक्टरांना जबाबदार धरले आहे. “डॉक्टरांनी ऍडमिट का केले नाही? उपचारातून डिस्चार्ज का दिला? डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच डेव्हिड यांचा मृत्यू झाला,” असे स्पष्ट आरोप त्यांनी केले आहेत.कुटुंबीयांनी कठोर भूमिका घेतली असून, “संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहाचे पोस्टमॉर्टम देखील करू देणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणारच नाही,” अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणामुळे रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.