टेंभुर्णीत हॉटेल कामगाराला नग्न करून मारहाण; हॉटेल मालक अटक

Spread the love

टेंभुर्णीत हॉटेल कामगाराला नग्न करून मारहाण; हॉटेल मालक अटक

पोलीस महानगर नेटवर्क

टेंभुर्णी (सोलापूर) – टेंभुर्णी येथील हॉटेल 7777 मधील कामगारावर केलेल्या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. प्रसारमाध्यमांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर टेंभुर्णी पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक लखन हरिदास माने याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आरोपी लखन माने याने ऑगस्ट २०२५ मधील रात्री अंदाजे ११ वाजता काम व्यवस्थित न केल्याच्या कारणावरून आपल्या हॉटेलमधील कामगाराला जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. माने याने कामगाराच्या अंगावरील कपडे जबरदस्तीने काढून खिशातील दोन हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर कामगारास नग्न करून हॉटेलबाहेर सर्वांसमोर शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या कृत्यामुळे इतर कामगारांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

याचबरोबर, “तू तक्रार दिलीस किंवा काम सोडलेस तर तुला ठार मारीन,” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित कामगार निवास आप्पासाहेब नकाते (वय ४४, रा. शिक्षक सोसायटी, बेंबळे रोड, टेंभुर्णी) यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

नकाते यांच्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७२०/२०२५ अन्वये भा.न्या.सं. २०२३ चे कलम ११९(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ११८(१), १२७(२), १३३, ३५६(२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon