इसेंस वापरून बनावट दारू तयार करणारे रॅकेट उघडकीस; पेठवडगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे धडक कारवाई करत बनावट दारू बनवणारे रॅकेट उघडकीस आणले. कारवाईदरम्यान इसेंस, कॅरॅमल, अवैध मध्यार्क आणि विविध साहित्यांसह एकूण ६ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या छापेमारीत रंजीत प्रकाश कांबळे (वय ४०) या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान कांबळे याने पोलिसांसमोर इसेंस वापरून काही क्षणांत वेगवेगळे ब्रॅण्ड तयार कसे केले जातात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दिले. त्यावरून बनावट दारूचे संपूर्ण जाळे कसे कार्यरत होते, हे स्पष्ट झाले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने केली. परिसरात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची विक्री सुरु असल्याच्या माहितीवरून ही छापेमारी करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.