७० वर्षीय डॉक्टरकडून केअर टेकर तरुणीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच आणखी तीन महिलांचा पुढे येण्याचा धक्कादायक प्रकार!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील उच्चभू सोसायटीत २१ वर्षीय केअर टेकर तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी ७० वर्षीय डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरण उघड झाल्यानंतर आणखी तीन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. डॉ. अनिल गर्ग असं आरोपीचं नाव असून, वर्तकनगर पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंग आणि बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कामाच्या शोधात मुंबईच्या भांडुप येथील दीपक एजन्सीशी संपर्क साधून ठाण्यातील एका सोसायटीत गर्ग कुटुंबाकडे केअर टेकर म्हणून रुजू झाली होती. घरात आरोपी आणि त्यांची पत्नी राहत होती. १८ ऑक्टोबर रोजी आरोपीने पीडितेला अश्लील काम करण्यास सांगितले, परंतु तिने नकार दिला. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी मालिश करण्याच्या बहाण्याने डॉक्टरने तरुणीला बेडरूममध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले व विनयभंग केला. या प्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीकडे पूर्वी काम करणाऱ्या आणखी तीन महिलांनीही पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्यांनीदेखील आपल्यासोबत अश्लील वर्तन आणि बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्व पीडितांचे जबाब नोंदवले असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकचौरे यांनी सांगितले की, “प्राथमिक तपासानंतर गुन्हा दाखल केला असून, चौकशीदरम्यान इतर पीडित महिलांच्या तक्रारींचीही सखोल छाननी करण्यात येणार आहे. तपासानंतर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.”
या घटनेमुळे ठाण्यातील केअर टेकर महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपी डॉक्टरच्या इतर संभाव्य पीडितांचा शोध सुरू आहे.