किरकोळ वादात अल्पवयीन टोळक्याचा हादरवून टाकणारा कट; सहा अल्पवयीन मुलांसह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यात कमी येताना दिसत नाही. आता एका अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश पुणे पोलीसांनी केला आहे. औंध येथील एका मॉलजवळ ‘अंडाभुर्जीची गाडी’ लावण्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून अल्पवयीन मुलांच्या एका टोळक्याने प्रतिस्पर्धी रवी ससाणे याचा ‘काटा काढण्याचा’ भयंकर कट रचला होता. पण गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने वेळीच कारवाई करत हा डाव उधळून लावला आहे. या प्रकरणी सहा अल्पवयीन मुलांसह एकूण आठ जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. सर्व आरोपी हे अल्पवयीन आहेत हे सर्वात धक्कादायक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील रवी ससाणे आणि आरोपींमध्ये औंध मॉलजवळ अंडाभुर्जीची गाडी लावण्यावरून पूर्वीपासून वाद होते. या वादातून दोन्ही गटांमध्ये मारहाणही झाली होती. सूत्रांनुसार, आर्यन फंड आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी या वादाचा सूड घेण्यासाठी रवी ससाणे याचा खून करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकत्र बैठका घेऊन योजना आखली आणि ससाणे वाचू नये म्हणून त्याला गोळ्या झाडून ठार करण्याचे ठरवले.
खुनाच्या कटासाठी या टोळक्याने मध्य प्रदेशातील गुरू सिंग याच्याशी संपर्क साधला. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मागवली होती. शस्त्रसाठा मिळाल्यानंतर हे टोळके ससाणे याला गाठण्याच्या योग्य संधीच्या प्रतीक्षेत होते. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला आरोपींच्या या घातक योजनेची गोपनीय माहिती मिळाली. अधिक तपासणीत, आरोपी सांगवीतील एका रुग्णालयाच्या मागील मोकळ्या जागेत भेटणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने साध्या वेशात परिसरात सापळा रचला.
आरोपी तिथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांसह आर्यन फंड आणि गुरू सिंग अशा आठ जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सांगवी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार, गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह हिंसक किंवा प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खंडणीविरोधी पथक सतत ऑनलाइन लक्ष ठेवत होते. या गुन्ह्यातील आरोपी देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हिंसक आणि धमकीपर पोस्ट शेअर करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते. याच माहितीच्या आधारावर पथकाने त्यांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे हा खुनाचा कट उधळण्यात आला आहे.