रोहित आर्या एन्काऊंटरप्रकरणात मोठा खुलासा! दीपक कसेरकर यांच्या अडचणी वाढणार?
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ३० ऑक्टोबर रोजी पवई येथील आर.के. स्टुडिओत रोहित आर्या याने १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवले होते. काही कोटी रक्कम सरकारकडे थकीत असल्याचा त्याचा दावा होता. यापूर्वी त्याने उपोषण सुद्धा केले होते. पण गेल्या महिन्याच्या अखेरीस त्याने मुलांना ओलीस ठेऊन मोठा कट रचला होता. त्याची मनधरणी करण्याचा आणि मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस रोहित आर्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला आणि रोहितशी बोलण्याची विनंती केली. पण केसरकरांनी आर्याशी बोलण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये रोहित ठार झाला. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.
मुंबई अपहरण प्रकरणात मोठा खुलासा समोर येत आहे. रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार असल्याचे समजते. गुन्हे शाखेकडून एपीआय अमोल वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचे जबाब नोंदण्यात आले आहे. रोहित आर्या हा काही माथेफिरू अथवा रेकॉर्डवरील गुन्हेगार नव्हता. मग पोलिसांनी त्याला का मारले असा सवाल करत हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे. पोलिसांच्या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
रोहित आर्याची मनधरणी करण्यात येत होती. त्याच्याशी पोलीस वाटाघाटी करत होते. त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करत होते. या घटनेदरम्यान रोहित आर्याने माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केल्याचे समोर येत आहे. त्यावेळी केसरकरांना फोन लागला नाही की बोलण्यास नकार दिला? हे समोर आले नाही. या दोन विरोधाभासी माहितीमुळे पोलिस संभ्रमात असल्याचे कळते. त्यासाठी चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.
प्रकरणाशी संबंधित अधिकारी, स्टुडिओ मालक आणि घटनेदरम्यान स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांनाही समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेकडून सविस्तर तपास सुरु आहे. वाटाघाटीत सहभागी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. आर्या मानसिक रुग्ण होता, असे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवण्यासाठीं मास्टरप्लॅन तयार केला होता. त्यासाठी त्याने काही महिने अगोदरच प्लॅन तयार केल्याची माहिती समोर आली आहे.