मुंब्रा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी दोन अभियंत्यांसह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; केंद्र-राज्य वादाची शक्यता
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ पाच महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी रेल्वेच्या दोन अभियंत्यांसह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे केंद्र आणि राज्य यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
९ जून रोजी सकाळच्या गर्दीच्या वेळी दोन जलद लोकलच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर आठ जण जखमी झाले होते. अपघातानंतर रेल्वेने अंतर्गत चौकशी केली असताना पोलिसांनी स्वतंत्र तपास करत ‘व्हीजेटीआय’कडून तांत्रिक अहवाल मागवला होता. त्या अहवालाच्या आधारे ‘सिनिअर सेक्शन इंजिनिअर’ समर यादव, ‘असिस्टंट डिव्हिजनल इंजिनिअर’ विशाल डोळस आणि इतर अधिकारी यांच्याविरुद्ध बीएनएस कलम १०५, १२५ (अ), १२५ (ब) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
तपासात उघडकीस आले की, दुर्घटनेच्या काही दिवसांपूर्वी रुळांची दुरुस्ती झाली होती, परंतु वेल्डिंगचे काम अपूर्ण राहिले. त्यामुळे दोन गाड्यांचे डबे अतिशय जवळ आले होते. या त्रुटीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असूनही योग्य उपाययोजना न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेने सावध भूमिका घेत “मुंब्रा दुर्घटनेची सखोल चौकशी पूर्ण झाली असून, मार्गावरील सेवा नियमित सुरू आहे,” असे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी स्पष्ट केले. तरीही पोलिसांच्या कारवाईनंतर केंद्र आणि राज्य यांच्यातील जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्हे आहेत.