पुणे हादरलं ! शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या १७ वर्षीय युवकाचा खून; ३ दिवसात दुसरी घटना
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नसून वाढतच आहे, शहरात दिवसाढवळ्या हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. त्यातच, मंगळवारी पुन्हा एकदा पुण्यात भरदिवसा खुनाचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर मयंक खराडे नामक व्यक्तीचा हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या ३ दिवसात झालेला हा दुसरा खून आहे. त्यामुळे, शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
पुण्यात आंदेकर खून प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली असून गेल्या काही महिन्यात अशा घटनांत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात गणेश काळे हत्याप्रकरणाने खळबळ उडाली होती. त्यानंतर, आता १७ वर्षीय मयंक खराडे या युवकाचा खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर खुनाची घटना घडली असून धारदार शस्त्र वापरत आरोपीने खून केल्याची माहिती आहे. या खुनाच्या घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
पुण्यात रक्तरंजित थराराची घटना घडली असून १७ वर्षीय तरुणावर वार करून तीन जणांनी त्याचा खून केला आहे.मंगळवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिजीत इंगळे व त्याचा मित्र मयंक खराडे हे त्यांच्या दुचाकीवर जात असताना महाराणा प्रताप उद्यानाच्याजवळ दखनी मिसळच्या समोर अचानक जनता वसाहतमधील तीन तरुणांनी मयंक खराडे याच्या डोक्यात व तोंडावर शस्त्राने वार केले. त्यामध्ये मयंक या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हे आरोपी तोंडावर मास्क लावून आले होते.