उद्धव ठाकरे उद्या घेणार पत्रकार परिषद; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ‘बॉम्ब’ टाकण्याची शक्यता
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या तातडीची पत्रकार परिषद बोलावली असून, या पत्रकार परिषदेत ते महत्त्वाचा खुलासा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अलीकडेच मनसे आणि महाविकास आघाडीने मतदार याद्यांमधील अनियमिततेविरोधात मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांतील घोळांविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद जाहीर केल्याने नव्या राजकीय घडामोडींना उधाण आलं आहे.
राज्यात सध्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ताधारी पक्षांत पक्षप्रवेशांचा ओघ सुरू असताना, विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर दबाव वाढवला जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील फुटीनंतर आणि पक्षाचे चिन्ह गमावल्यानंतर आता ते पुन्हा एकदा नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. सुप्रीम कोर्टात त्यांच्या याचिकांवर लवकरच दैनंदिन सुनावणी होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर उद्याच्या पत्रकार परिषदेत ठाकरे काय बोलतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.