मुंबईतील उद्योजकाला ४ कोटींचा गंडा; ठाण्यात बांधकाम गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

Spread the love

मुंबईतील उद्योजकाला ४ कोटींचा गंडा; ठाण्यात बांधकाम गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क 

ठाणे – मोठ्या बांधकाम प्रकल्पात गुंतवणुकीचं आमिष दाखवून मुंबईतील एका उद्योजकाची तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार उद्योजक आणि संशयित आरोपी हे अनेक वर्षांपासून परिचित होते. आरोपीने १४ जानेवारी २०१६ ते १४ जून २०२४ या कालावधीत तक्रारदाराच्या मुलुंड चेकनाका (ठाणे) येथील कार्यालयात भेट देत आपल्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रकल्पात गुंतवणुकीस प्रवृत्त केले.

त्यावेळी आरोपीने “प्रकल्प वर्षभरात पूर्ण न झाल्यास गुंतवणूक रक्कमेवर १८ टक्के वार्षिक व्याज तसेच प्रकल्पातील नफ्यातील हिस्सा” देण्याचं आश्वासन दिलं. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने एकूण ४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही न व्याज मिळालं, न नफ्याचा हिस्सा. उलट आरोपीने ही रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून उद्योजकाची फसवणूक केली.

या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा (कलम ४२० इ.) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना संशय आहे की आरोपीने अशाच प्रकारे इतर व्यावसायिकांनाही गंडा घातला असावा.

या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, “या आरोपीकडून कोणी अशाच प्रकारे फसवले गेले असल्यास तत्काळ ठाणे पोलिसांशी संपर्क साधावा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon