साताऱ्यानंतर मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या सरकारी डॉक्टरवर भररस्त्यात चाकूने सपासप वार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण ताजे असताना आता मुंबईतील सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या २६ वर्षीय डॉक्टरवर जीवघेणा चाकूहल्ला करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिलीय. केईएमच्या डॉक्टरवर एका महिलेच्या भावासह तीन जणांनी चाकूहल्ला केल्याने खळबळ उडालीय.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर आणि चाकूहल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या बहिणीचे प्रेमसंबंध होते. चाकूहल्ल्याची घटना बुधवारी सकाळी केईएम हॉस्पिटलबाहेर असणाऱ्या हनुमान मंदिराजवळ घडली. हल्ला करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव विशाल यादव असे आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “डॉ. विशाल यादव यांच्यावर त्यांच्या प्रेयसीच्या भावाने हल्ला केला. विशाल यादव हॉस्पिटलच्या सीव्हीटीएस विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या प्रेयसीच्या नातेवाईकांना नुकतेच प्रेमसंबंधांबाबतची माहिती समजली होती”.
भोईवाडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेचा भाऊ फरीद खानने साथीदार नबील आणि आणखी एका व्यक्तीसोबत मिळून डॉक्टरवर चाकूहल्ला केला, या हल्ल्यात डॉक्टर विशाल गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलीस तपास सुरू आहे.