अंबरनाथ मधील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्टवर नवऱ्याचा जीवघेणा हल्ला; किरण यांच्या डोक्यावर खलबत्त्यानं वार

Spread the love

अंबरनाथ मधील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्टवर नवऱ्याचा जीवघेणा हल्ला; किरण यांच्या डोक्यावर खलबत्त्यानं वार

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – अंबरनाथमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण शिंदे यांना त्यांच्या पतीने मारहाण केली आहे. किरण यांच्या डोक्यावर खलबत्त्यानं वार केल्याने त्या जखमी झाल्या आहेत. किरण शिंदे यांच्यावर सध्या बदलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. किरण यांच्या तक्रारीनंतर आता त्यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, डॉक्टर किरण शिंदे या अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया गृह संकुलात पती आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी त्या गाण्याचा रियाज करण्यासाठी उठल्या आणि पती विश्वंभर शिंदे यांचा चहा करण्यासाठी किचनमध्ये गेल्या. मात्र त्याचवेळी विश्वंभर शिंदे यांनी त्यांच्यात सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून किचनमध्ये येऊन किरण शिंदे यांचा गळा पकडत त्यांच्या डोक्यात खलबत्त्याने हल्ला करत त्यांना मारहाण केली.

पतीने केलेल्या हल्ल्यामुळे किरण यांनी आरडाओरडा केला. किरण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुलांनी किचनमध्ये धाव घेत आईची सुटका केली. आता त्यांना बदलापूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यानंतर पोलिसांनी डॉक्टर किरण शिंदे यांचा जबाब नोंदवला असून सध्या अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या मारहाणीत माझा जीवही जाऊ शकला असता त्यामुळे पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी किरण शिंदे यांनी केली आहे.

या घटनेबाबत बोलताना किरण शिंदे यांनी सांगितले की, सकाळी चार-साडेचारला मी उठले आणि गायनाचा सराव करायला बसले. मी मुलगा झोपला होता त्या रूमध्ये होते. मी पतीला विचारले की चहा घेणार का? याच्या एक दिवस आधी आम्ही माथेरानला गेलो होतो. माझ्या एका शालेय मित्राने मला नाईस डीपी असा मेसेज पाठवला होता. पतीला या गोष्टीचा राग होता. त्याने किचनमध्ये येऊन खलबत्ता जो असतो त्याने मारहाण केली, मला ढकललं, माझा गळा दाबला.

पुढे बोलताना किरण यांनी सांगितले की, मी ओरडायला लागल्यानंतर मुले जागी झाली आणि त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या डोक्यातून रक्त निघत होतं. गाऊन, टीशर्ट रक्ताने माखला होता. पतीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्याला अटक करण्यात यावी. मी हे बऱ्याचदा सहन केलं आहे. मी मुलांसाठी अडजस्ट करत आहे. मात्र यावेळी अति झालं, यात माझा जीवही गेला असता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon