भाजप नेत्या नवनीत राणा यांना गँगरेप आणि जीवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
अमरावती – अमरावतीतील भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यांना पुन्हा एकदा अत्यंत गंभीर स्वरूपाची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांना यावेळी जीवे मारण्याची आणि गँगरेप करण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. यात त्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे धमकीचे पत्र स्पीड पोस्टच्या माध्यमातून थेट नवनीत राणा यांच्या अमरावती येथील कार्यालयात पाठवण्यात आले आहे. हे पत्र हैदराबाद येथील जावेद नावाच्या व्यक्तीकडून पाठवण्यात आले आहे. या पत्रात अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या स्तराचे शब्द वापरले असून, गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आली आहे.
नवनीत राणा यांना अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत वारंवार चिंता व्यक्त केली गेली आहे.या गंभीर धमकीच्या घटनेनंतर नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांनी तातडीने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्वरित गुन्हा दाखल केला असून, पत्रातील मजकूर आणि ते कोणत्या उद्देशाने पाठवण्यात आले आहे. याचा शोध राजापेठ पोलिसांकडून सुरु आहे.