अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांकडून मोठा झटका; खास माणूस दानिश चिकनाला गोव्यातून उचललं
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा खास माणूस डोंगरीत त्याची ड्रग्स फॅक्टरी संभाळणारा ड्रग तस्कर दानिश चिकनाला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. दानिश चिकना दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आहे. भारतातल्या ड्रग्स सिंडिकेटचा तो भाग आहे. याआधी एनसीबी ने त्याला अटक केली होती. डोंगरी भागात ड्रग्स सिंडिकेट चालवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याचं खरं नाव दानिश मर्चेंट आहे. एनसीबी मुंबईच्या माध्यमातून गोव्यात ही अटक कारवाई झाली आहे. या अटकेमुळे दाऊदच्या ड्रग्स साम्राज्याला मोठा झटका बसला आहे.
पोलीस दानिश चिकनाची चौकशी करुन अधिक माहिती गोळा करतायत. याआधी त्याला मागच्यावर्षी अटक झाली होती. २०१९ साली एनसीबीने डोंगरी भागात दाऊदच्या ड्रग्स फॅक्टरीचा पदार्फाश करत कोट्यवधीचे ड्रग्स ताब्यात घेतले होते. जिथे हे ड्रग्ज पकडण्यात आले, तिथे भाजीपाल्याची दुकानं चालत होती. याच दुकानाच्या आडून ड्रग्सचा हा व्यवसाय सुरु होता.
दानिश मर्चेंटला त्यावेळी राजस्थानातून अटक करण्यात आलेली. काहीवेळानंतर तो तुरुंगाबाहेर आला. चिकना दाऊदचा सर्व ड्रग्स व्यवसाय संभाळतो. संपूर्ण मुंबईसह देशभरात त्याचं नेटवर्क चालतं. अनेकदा अटक झाल्यानंतरही त्याने ड्रग्जचा धंदा सोडलेला नाही. पोलिसांनी आधीच त्याची फॅक्टरी उद्धवस्त केलेली.
दानिश दाऊदचा खास माणूस युसूफ चिकनाचा मुलगा आहे. दाऊद सोबत दानिशचे सुद्धा चांगले संबंध आहेत. पोलीस बऱ्याच काळापासून त्याच्या मागावर होते. प्रत्येकवेळी तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी व्हायचा. गोव्यातून अटक केल्यानंतर पोलिस आता त्याला मुंबईत घेऊन येतील. तिथे त्याच्या संपूर्ण ड्रग्स व्यवहाराची चौकशी होईल. या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होऊ शकतात.