भांडण मिटवण्याच्या बहाण्याने चाकू हल्ला; दोन युवतींसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

भांडण मिटवण्याच्या बहाण्याने चाकू हल्ला; दोन युवतींसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई – दोन आठवड्यांपूर्वी तुर्भे येथे मित्राला जेवणाच्या निमित्ताने बोलावून त्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईत पुन्हा अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. करावे गावात एकमेकांच्या ओळखीतील युवकाला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोन युवतींसह चार जणांविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करावे गावात राहणारे सुमित आणि इसराईल इसाक शेख हे दोघे मित्र असून काही दिवसांपूर्वी मोबाईलसंबंधी पैशांच्या देवाणघेवाणीवरून त्यांच्यात वाद झाला होता. यानंतर दोघांमधील बोलणे थांबले होते. मात्र, सुमित याने वाद मिटवण्यासाठी इसराईलला बोलावले. “सगळं विसरून नव्याने सुरुवात करूया” असे सांगत त्याला २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सेक्टर ३६ येथील ‘स्काय’ या पडीक इमारतीत भेटण्याचे निमंत्रण दिले.

इसराईल ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी पोहोचला, मात्र चर्चा सुरू असतानाच सुमितने अचानक लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढून इसराईलच्या पाठीवर व मानेवर सपासप वार केले. त्याचवेळी सुमितच्या बहिणी गौरी आणि संगीता तसेच अमोल यांनीही इसराईलला बेदम मारहाण केली.

गंभीर जखमी अवस्थेत इसराईलने इमारतीतून बाहेर पडून नातेवाईकांना फोन केला. नातेवाईकांनी त्याला तात्काळ मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर इसराईल बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांना घटनेचा तपशील मिळू शकला नव्हता. सोमवारी तो शुद्धीवर आल्यावर त्याचा जबाब घेण्यात आला असून, त्यावरून एनआरआय पोलीस ठाण्यात सुमित, त्याच्या बहिणी गौरी आणि संगीता तसेच अमोल या चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon