कोल्हापूर शहरात दुपारच्या वेळी घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला अटक; ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

कोल्हापूर शहरात दुपारच्या वेळी घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला अटक; ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात दुपारच्या वेळी नागरिक वामकुक्षी घेत असताना हळूच दबक्या पावलांनी घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. साने गुरुजी वसाहतीतील देवणे गल्ली येथील मानसी लक्ष्मीकांत खरे (५०) या महिलेच्या चौकशीतून तीन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, तिच्याकडून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.

मानसी खरे ही दुपारच्या वेळी कोल्हापूर शहरातील घरी दबक्या पावलांनी शिरायची. जेवण आणि विश्रांतीच्या वेळी अनेक घरांचे मुख्य दरवाजे फक्त ओढलेले असतात. याचाच फायदा घेऊन ती घरात शिरून थेट देवघर गाठत असत. तिथे चांदीच्या मौल्यवान मूर्ती, निरंजने आणि इतर पूजेचे साहित्य लंपास करून पसार होत असे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या या वेगळ्या चोरीच्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

या प्रकरणाची सुरुवात २३ डिसेंबर २०२५ रोजी शुक्रवार पेठेतील उदय मधुकर देवरूखकर (६५) यांच्या घरी झालेल्या चोरीने झाला. दुपारी उघड्या दरवाजातून शिरलेल्या चोरट्याने देवघरातील सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांच्या चांदीच्या मूर्ती, सोन्याच्या किरीट आणि पाचू मणी असा ऐवज लंपास केला होता. यानंतर उत्तरेश्वर पेठेतील ज्योती किरण मगदूम (४३) यांच्या घरीही अशाच प्रकारची चोरी झाली. देवघरातील चांदीच्या मूर्ती आणि पैंजण जोड चोरीला गेला होता.

या गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा छडा लावला. गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलेची माहिती मिळाली. २१ फेब्रुवारी रोजी गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मानसी खरेला ताब्यात घेतले. चौकशीत तिने तीन गुन्ह्यांची कबुली दिली.

दरम्यान, ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ कळंत्रे, प्रीतम मिठारी, गजानन परीट, मंगेश माने, किशोर पवार आणि तानाजी देवणे यांच्या पथकाने केली. शहरात अशा प्रकारच्या चोऱ्या टाळण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलीसांनी दिलं आहे. मानसीचा आणखी कुठल्या गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा सखोल तपास सुरू असून, तिच्या या कृत्यामुळे स्थानिक पातळीवर सुरक्षा वाढवण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon