नवी मुंबईत उघड्यावर सुरू ‘राज क्लब’ जुगार अड्डा; खांदेश्वर पोलिसांच्या नाकाखाली २४ तास अवैध धंदा!

नवी मुंबई – पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नवी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था प्रभावीपणे राखली जात असताना, खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मात्र कायद्याला चक्क डावलून उघड्यावर सुरू असलेला ‘राज क्लब’ नावाचा जुगार अड्डा चर्चेचा विषय ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अवैध प्लेइंग कार्ड क्लब सुकापुर, साई वॉशिंग सेंटरजवळ, पनवेल–माथेरान रोड येथे ‘वर्षी फर्निचर हाऊस’च्या वरच्या मजल्यांवर सुरू आहे. इमारतीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि टेरेस मजल्यावर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये २४ तास जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. भूतळ दुकानदारांसाठी वापरला जातो, तर वरच्या मजल्यांवर अवैध हालचाली सुरू असतात.
दरम्यान, पोलीस रेडची खबर मिळताच खेळाडू मागच्या बाजूला असलेल्या लोखंडी जिन्यावरून पलायन करतात, अशी स्थानिकांची माहिती आहे. संबंधित इमारत रवींद्र वेवेकर या व्यक्तीची असल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, “खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या अगदी जवळ असा उघड्यावरचा जुगार अड्डा सुरू राहाणे म्हणजे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की, या अवैध ‘राज क्लब’ ला संरक्षण कोण देत आहे?
राजकीय पाठबळ किंवा पोलिसांतील अंतर्गत मिलीभगत असल्यामुळेच का हा धंदा इतक्या उघडपणे सुरू आहे?
स्थानिक नागरिकांनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वतः याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.