दैनिक पोलीस महानगरच्या पाठपुराव्याला यश!
रिकीज बार अँड किचन समोरील अनधिकृत शेडवर अखेर हातोडा
पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – अखेर दैनिक पोलीस महानगरच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरातील रिकीज बार अँड किचन समोरील अनधिकृत शेड अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी दैनिक पोलीस महानगरचे आभार मानत “पत्रकारितेचा खरा अर्थ लोकहितासाठी उभे राहणे” हे पुन्हा सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
परवानगीच्या अटींचा भंग
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांनी संबंधित ठिकाणी शेड उभारण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र या परवानगीस काही अटी, नियम व शर्ती जोडून देण्यात आले होते. या सर्व अटींचा रिकीज बार अँड किचनचे मालक दररोज भंग करत होते, हे स्थानिक रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले होते.
तक्रारींनंतरही प्रशासनाचे मौन
सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेविका तसेच पत्रकारांनी वारंवार तक्रारी करूनही ठाणे महानगरपालिका कोणतीही ठोस कारवाई करत नव्हती. या शेडमध्ये खुलेआम मद्यप्राशन, नाचगाणी आणि अश्लील हावभावाचे प्रकार सुरू होते. तरीसुद्धा प्रशासनाचे मौन कायम राहिल्याने संगनमताचा संशय अधिक बळावला होता.
‘पोलीस महानगर’चा सातत्यपूर्ण पाठपुरावा
या सर्व प्रकारावर दैनिक पोलीस महानगरने सातत्याने वृत्तांकन करत, ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त पाटोळे, परिमंडळ-३ चे उपायुक्त दिनेश तायडे आणि सहाय्यक आयुक्त सोनल काळे यांच्या निदर्शनास विषय वारंवार आणून दिला गेला.
“अधिकारी जनतेसाठी की रिकीज बारच्या मालकासाठी?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता. अखेर या लोकदबावानंतर आणि दैनिक पोलीस महानगरच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासन हलले आणि हिरानंदानी इस्टेट येथील सोलस बिल्डिंग समोरील फुटपाथवरील अनधिकृत शेड जमीनदोस्त करण्यात आला.
नागरिकांचा दिलासा आणि कृतज्ञता
या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून, दैनिक पोलीस महानगरचे आभार मानले आहेत. “पत्रकारितेची खरी ताकद दाखवून दिल्याबद्दल आम्ही या वृत्तपत्राचे मनःपूर्वक अभिनंदन करतो,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
अनधिकृत बांधकामे, नियमभंग आणि प्रशासनातील शिथिलतेविरोधात ‘पोलीस महानगर’ची भूमिका पुढेही ठाम राहील, असे संपादकीय मंडळाने स्पष्ट केले आहे.