फटाके फोडले, ‘भाई’ बोलावले! कल्याणमध्ये मध्यरात्री गँगवॉर-सदृश राडा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : फटाके फोडण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद मध्यरात्री गँगवॉरमध्ये परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना कल्याणजवळील मोहने परिसरात बुधवारी घडली. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यात धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला, तसेच परिसरातील घरांवर दगडफेकही करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या माहितीनुसार, मोहने येथील एनआरसी गेटजवळ एक तरुण रस्त्यावर फटाके फोडत होता. फटाके स्टॉलजवळ फेकले जात असल्याने आग लागण्याची शक्यता निर्माण झाली. स्टॉलधारकाच्या बहिणीने त्याला फटाके न फोडण्यास सांगितल्यावर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्या तरुणाने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले आणि स्टॉलधारकासह त्याच्या बहिणीवर हल्ला केला.
या घटनेनंतर स्टॉलधारकाचे समर्थकही एकवटले आणि त्यांनी फटाके फोडणारा तरुण राहत असलेल्या लहूजी नगर परिसरात घुसून दगडफेक आणि मारहाण केली. सुमारे दोन तास हा राडा सुरू होता. रात्री उशिरा कल्याण विभागाचे डीसीपी अतुल झेंजे आणि एसीपी कल्याणजी घेटे घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
खडकपाडा पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला असून, तब्बल ६० जणांची ओळख पटली आहे. आतापर्यंत ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एका गटाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर मरसाळे यांनी पोलिसांकडे मागणी केली की, “आरोपींविरोधात ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यानुसार कारवाई झाली असली तरी निर्दोष व्यक्तींना गुन्ह्यात गोवू नये.”
तर आगरी-कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी सांगितले की, “फटाके फोडण्यास मज्जाव केल्यामुळे स्टॉलधारकास मारहाण करण्यात आली आणि महिलेशी गैरवर्तन झाले. या घटनेचा व्हिडिओ पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, मात्र निरपराधांना त्रास होऊ नये.” सध्या मोहने परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.