कल्याणमध्ये एटीएम फसवणूक; ‘पैसे काढून देतो’च्या बहाण्याने १.८६ लाखांवर डल्ला

Spread the love

कल्याणमध्ये एटीएम फसवणूक; ‘पैसे काढून देतो’च्या बहाण्याने १.८६ लाखांवर डल्ला

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : कल्याण पूर्व भागात एटीएममध्ये पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी तीन ग्राहकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोड आणि खडेगोळवली परिसरातील एटीएममध्ये चार भामट्यांनी हातचलाखीने एटीएम कार्ड अडकवून गुप्त संकेतांक मिळवला आणि एकूण १ लाख ८६ हजार रुपये काढून पसार झाले.

पुना लिंक रोडवरील सलगर शॉप सेंटरमधील एचडीएफसी बँक एटीएममध्ये नंदकिशोर रमेश पाटील आणि वैभव प्रकाश आव्हाळे पैसे काढत असताना ही घटना घडली. भामट्यांनी कार्ड एटीएमच्या खाचेत अडकवून ‘कार्ड काढून देतो’ असे सांगत गुप्त संकेतांक विचारला. त्यानंतर त्या संकेतांकाच्या आधारे त्यांनी खात्यातील रक्कम काढून घेतली. काही वेळाने खात्यातून पैसे काढल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी धावपळ केली.

याच पद्धतीने खडेगोळवली भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये यशवंत हिरामण मगरे यांचीही फसवणूक करण्यात आली. संध्याकाळच्या सुमारास एटीएममध्ये आलेल्या चौघांनी कार्ड अडकवून संकेतांक मिळवला आणि खात्यातील रक्कम काढून पसार झाले.

या प्रकरणी नंदकिशोर पाटील यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सापटे तपास करत असून, कल्याण पूर्व भागात अशी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी एटीएममध्ये अनोळखी व्यक्तींकडून मदत स्वीकारू नये आणि कोणत्याही परिस्थितीत गुप्त संकेतांक सांगू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon