“डिजिटल अटक ही फसवणूक आहे!” नागरिकांनी सजग राहावे; सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे डीआयजी संजय शिंत्रे यांचे आवाहन

Spread the love

“डिजिटल अटक ही फसवणूक आहे!” नागरिकांनी सजग राहावे; सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे डीआयजी संजय शिंत्रे यांचे आवाहन

रवि निषाद / मुंबई

मुंबई – सायबर गुन्हेगारांकडून नव्या प्रकारे नागरिकांची फसवणूक केली जात असून “डिजिटल अटक” या नावाने चालणाऱ्या या फसवणुकीपासून सावध राहावे, असे स्पष्ट आवाहन महाराष्ट्र राज्य सायबर सेलचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री संजय शिंत्रे (भा.पो.से.) यांनी केले आहे. पोलीस महानगरमध्ये आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

श्री शिंत्रे यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार आता स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय प्रतिनिधी किंवा इतर सरकारी यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांवर खोटे आरोप करतात. हे आरोपी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधतात, अटक करण्याची धमकी देतात, तसेच पीडितांना कुटुंबीयांशी संपर्क तोडण्यास भाग पाडतात. नंतर क्रिप्टोकरन्सी किंवा अन्य डिजिटल माध्यमातून पैसे मागण्यात येतात.

कॉलदरम्यान आरोपींकडून पीडितांवर सतत नजर ठेवली जाते. ते बनावट नोटीस, कागदपत्रे किंवा ओळखपत्र दाखवून दबाव आणतात. अशा फसवणुकीच्या जाळ्यात विशेषतः ४५ वर्षांवरील नागरिक, निवृत्त व्यक्ती, गृहिणी, वरिष्ठ अधिकारी, एकटे राहणारे किंवा सायबर फसवणुकीबाबत अनभिज्ञ लोक सहज अडकतात. अटक होण्याची भीती, माहितीचा अभाव आणि एकाकीपणा या गोष्टींचा गुन्हेगारांकडून गैरफायदा घेतला जातो, असे त्यांनी नमूद केले.

श्री शिंत्रे यांनी पुढे सांगितले की, “डिजिटल अटक” ही कोणत्याही सरकारी प्रक्रियेचा भाग नाही आणि ती पूर्णतः फसवणूक आहे. कोणताही संशयास्पद कॉल आल्यास नागरिकांनी 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसेच आधार क्रमांक, बँक माहिती किंवा वैयक्तिक तपशील अनोळखी व्यक्तींना देऊ नयेत.

अशा प्रसंगी कुटुंबीयांना तत्काळ माहिती देणे, कॉल रेकॉर्ड ठेवणे आणि सायबर पोलिसांकडे पुरावे सादर करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. “बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेवू नका, दबावाला बळी पडू नका आणि एकाकीपणाची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका,” असे आवाहन करत श्री शिंत्रे यांनी शेवटी सांगितले की,“सायबर सुरक्षेसाठी जागरूकता आणि तात्काळ कृती हाच सर्वोत्तम उपाय आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon