कल्याणमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; गॅरेज फोडून लाखोंची चोरी
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता चोरट्यांनी कल्याण पूर्वेकडील मलंग रोड परिसरातील एका गॅरेजला लक्ष्य केले आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी गॅरेज फोडले आणि चारचाकी वाहनांसाठी लागणारी सुमारे १.५० लाख रुपये किमतीची नवी सामग्री चोरून पोबारा केला. चोरीची ही संपूर्ण घटना गॅरेजमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कल्याण पूर्वेकडील मलंग रोडवरील एका गॅरेजमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. चोरटे रात्रीच्या वेळी गॅरेजमध्ये घुसले आणि त्यांनी चारचाकी वाहनांसाठी लागणारे महागडे साहित्य लंपास केले. चोरट्यांनी चोरी केलेले साहित्याचे बाजारमूल्य सुमारे १.५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हातीचोरीची ही घटना गॅरेजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
या फुटेजमध्ये चोरटे गॅरेजमधून सामग्री चोरून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. गॅरेज मालकाने तातडीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. आता, पोलिसांना या चोरी प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज मिळाला असून, त्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि रिक्षा चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच, घरांमध्ये संधीचा फायदा घेऊन सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत.विशेषतः, दिवाळीच्या सणामुळे अनेक नागरिक गावी गेले असताना, बंद घरांची कुलूपे तोडून चोरी झाल्याच्या घटनाही नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. कोळसेवाडी पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून, लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.