अंबरनाथमध्ये हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्याचा आरोप

Spread the love

अंबरनाथमध्ये हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्याचा आरोप

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – अंबरनाथ येथील एका ६६ वर्षीय महिलेला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने तातडीने शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारासाठी पुढील रुग्णालयात हलवण्याआधीच तिची प्राणज्योत मालवली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्याने ती वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्याचा आरोप करण्यात येत आहे. रुग्णालयाने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ शहरातील स्वामी नगर येथील ६६ वर्षीय मीना सूर्यवंशी यांना रविवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना गंभीर अवस्थेत छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना ठाणे किंवा मुंबई येथील रुग्णालयात हलवण्याची गरज असल्याचे सांगितले.

दरम्यान, रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध झाली नसल्याने सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अंबरनाथ येथे धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचा लोकार्पण सोहळा झाला. या कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्यामुळे ती सूर्यवंशींना वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही, असा गंभीर आरोप केला जात आहे.

या आरोपांवर रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. शुभांगी वाडेकर यांनी सांगितले की, ‘मीना सूर्यवंशी यांना रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हाच त्यांची स्थिती गंभीर होती. आवश्यक प्राथमिक उपचार करण्यात आले, तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, १५ मिनिटांच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही, हा आरोप तथ्यहीन आहे.

अंबरनाथ पश्चिम भागातील सर्कस मैदान येथे धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचे लोकार्पण रविवारी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी अशोक सराफ, महेश कोठारे, उषा नाडकर्णी, अलका कुबल, मकरंद अनासपुरे, विजय पाटकर, विजय गोखले, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, संतोष जुवेकर, अशोक पत्की, अशोक समेळ, मंगेश देसाई यासारखे दिग्गज कलाकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon