एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याकडून वृद्ध महिलेचं अपहरण; दोघांच्या मदतीने रचला धक्कादायक प्लान

Spread the love

एकनाथ शिंदे गटाच्या नेत्याकडून वृद्ध महिलेचं अपहरण; दोघांच्या मदतीने रचला धक्कादायक प्लान

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – नाशिकमध्ये पोलिसांकडून गुन्हेगारांवर मोठी धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान नाशिकमधील अनेक राजकीय पक्षातील लोकांवरील गुन्हे उघडकीस येत आहे. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये शिंदे गटाचा माजी नगरसेवक पवन पवार याच्यासह त्याचा भाऊ विशाल पवार आणि कल्पेश किरवे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२३ मध्ये पवन पवार याने त्याचा भाऊ विशाल पवार आणि साथीदार कल्पेश किरवे याच्यासह एका महिलेचं अपहरण केलं आणि तिची आर्थिक लूट केली होती. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन पवार याने त्याचा भाऊ विशाल पवार आणि साथीदार कल्पेश किरवे यांच्या मदतीने एका वृद्ध महिलेचे २० लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध महिलेने ही तक्रार नोंदवली आहे. २०२३मध्ये या वृद्ध महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर शिंदे गटाचे माजी नगरसेवक पवन पवार यांनी या वृद्ध महिलेला नाशिकच्या इंदिरानगर परिसरात चाकूचा धाक दाखवत तिचं अपहरण केलं. जीवे मारण्याची धमकी देत पतीच्या नावे असलेली मिळकत विशाल पवार याच्या नावाने तयार केलेल्या एका नोटरी रजिस्टर जनरल मुख्यपत्रावर महिलेच्या सह्या घेतल्या. यानंतर महिलेला सेंट्रल बँकेत वीस लाखांची रक्कम जमा करण्यास सांगितली.

त्यानंतर बळजबरीने वृद्ध महिलेच्या सह्या घेऊन ती रक्कम लगेचच परत काढून घेतली. पवन पवार याची परिसरात मोठी दहशत असल्याने घाबरून वृद्ध महिलेने तक्रार दिली नव्हती. मात्र आता पोलिसांनी या धडक कारवाईला सुरुवात केल्यानंतर या वृद्ध महिलेला परिसरातील नागरिकांनी तक्रार देण्यास धीर दिला. त्यानंतर पवन पवार याच्यासह त्याचा भाऊ विशाल पवार आणि साथीदार कल्पेश किरवे याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon