मैत्रिणीवरून वाद, मित्राचा गळा चिरला! आरोपीला पोलिसांनी धडा शिकवत काढली सार्वजनिक धिंड

Spread the love

मैत्रिणीवरून वाद, मित्राचा गळा चिरला! आरोपीला पोलिसांनी धडा शिकवत काढली सार्वजनिक धिंड

योगेश पांडे / वार्ताहर

छत्रपती संभाजीनगर – मैत्रीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. एका मैत्रिणीवरून झालेल्या किरकोळ वादातून एका जिवलग मित्रानेच दुसऱ्या मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची निर्घृण घटना उघडकीस आली आहे. या घटनेने शहर हादरले असून, पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केली. या निर्घृण कृत्यानंतर पोलिसांनी आरोपीची सार्वजनिक धिंड काढली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य जालना रोडवरील एसएफएस मैदानावर १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह नागरिकांना आढळून आला. मृताचा गळा चिरलेला असल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे तात्काळ स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि सिटी चौक पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी जलद गतीने तपासचक्रे फिरवत अवघ्या १२ तासांत आरोपीला जेरबंद केले. खून झालेल्या तरुणाचे नाव सुरेश भगवान उंबरकर असे आहे. तर, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन उर्फ जंगली मच्छिंद्र जाधव (२४) असे आहे.

पोलिसांच्या तपासात उघड झाले की, सुरेश आणि सचिन हे दोघेही पूर्वी एकाच गल्लीत राहात होते आणि त्यांच्यात घट्ट मैत्री होती. सचिन नेहमी सुरेशच्या जवाहर कॉलनी रोडवरील “प्रिन्स अंडा ओम्लेट” गाडीवर वेळ घालवत असे. घटनेच्या दिवशीही दोघे दिवसभर एकत्र होते आणि रात्री ते एसएफएस मैदानावर गेले होते.

मैदानावर गेल्यानंतर दोघांमध्ये एका मुलीवरून तीव्र वाद सुरू झाला. या वादातून संतापाच्या भरात आणि नशेच्या अवस्थेत असलेल्या आरोपी सचिनने आपल्या जवळील धारदार शस्त्राने मित्र सुरेशचा गळा चिरला. गंभीर जखमेमुळे सुरेशचा जागीच मृत्यू झाला. मित्राला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून आरोपी सचिन घटनास्थळावरून फरार झाला.
या निर्घृण खुनानंतर पोलिसांनी आरोपी सचिन उर्फ जंगली जाधव याला अटक केली. समाजात दहशत निर्माण करणाऱ्या आणि मैत्रीसारख्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल पोलिसांनी त्याला कठोर संदेश देण्यासाठी एक मोठी कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला ज्या परिसरात त्याने खून केला, त्याच ठिकाणी आणून गुडघ्यावर बसवून त्याची ‘धिंड’ काढली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन उर्फ जंगली मच्छिंद्र जाधव याच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात “मैत्री” या पवित्र नात्याच्या विटंबनेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon