ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा इम्पैक्ट; ठाणे महापालिकेतून सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची निवडणूक विभागात बदली
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने ठाण्यात काढलेल्या मोर्चानंतर शुक्रवारी मोठी घडामोड झाली आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची निवडणूक विभागात बदली करण्यात आली आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकाम आणि आगामी मतदारयादीतील संभाव्य घोळावरून ठाकरे गट-मनसेच्या मोर्चात बोरसे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात आले होते.शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्तांनी सचिन बोरसे यांच्याकडून निवडणूक विभागाची जबाबदारी काढली. ठाकरे गट आणि मनसेचा मोर्चा ठाण्यात झाला होता. या मोर्चात आयुक्तांच्या भेटीत एका अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी शिष्टमंडळाने केली होती. अखेर ठाणे महापालिका आयुक्तांनी सचिन बोरसे यांची बदली केली. आता निवडणूक विभाग त्यांच्याकडून काढून परवाना विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका ही भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे. तिला आता सुधारावेच लागेल. अधिकारी वर्गाने तिला पोखरून टाकले. गोल्डन गँगच्या लीडरने ठाण्याचे वाटोळे केले आहे, या भ्रष्टाचारापासून रोखण्यासाठी एकत्र आलो असल्याचे माजी खासदार राजन विचारे यांनी मोर्चात म्हटले. काही विभागात आजही भ्रष्ट अधिकारी काम करत आहेत. निवडणूक विभागात कार्यरत असलेले सचिन बोरसे याला हटवा, त्यांची बदली का केली जात नाही असा सवाल शिष्टमंडळाने ठाणे महापालिका आयुक्तांना केला होता.
मतदान यादीवर काम सुरू आहे मात्र त्यात काही घोळ झाला, बोगस मतदार घुसविले तर यावेळी त्या अधिकाऱ्याला सोडणार नाही असा इशारा माजी खासदार राजन विचारे यांनी दिला होता. मनपा मधील शहर विकास विभागात सुरू असलेला घोटाळा तुम्हाला माहित नाही का असे अनेक सवाल करून महाविकास आघाडीच्या नेत्यानी आयुक्तांना भांबावून सोडले होते. त्यानंतर आज ठाणे महापालिका आयुक्तांनी बोरसे यांची बदली केली.