नवी मुंबई येथे राज्य मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्थेचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न!
रवि निषाद / वार्ताहर
नवी मुंबई – राज्य मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्था तर्फे आयोजित भव्य जिल्हास्तरीय मेळावा नवी मुंबईत उत्साहात आणि एकात्मतेच्या वातावरणात पार पडला. समाजबांधवांची मोठ्या संख्येतील उपस्थिती आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे कार्यक्रमाला भव्य स्वरूप लाभले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोकनेते नामदार गणेश नाईक (वनमंत्री तसेच पालकमंत्री, पालघर जिल्हा) हे होते. त्यांच्या सोबत मंचावर राज्य मुस्लिम खाटीक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, नवी मुंबईचे प्रथम महापौर संजीव नाईक, माजी स्थायी सभापती अनंत सुतार, माजी क्रीडा सभापती मुन्नावर पटेल, नगरसेवक राजेश मडवी, उपाध्यक्ष जावेद कुरेशी, अॅड. ईशा अगरवाल, तसेच प्रसिद्ध अभिनेता शहजाद खान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना लोकनेते गणेश नाईक यांनी समाजातील एकता, प्रगती आणि बंधुभावाचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी स्वर्गीय साबीर भाई शेख यांच्यासोबतचा आपला सामाजिक व राजकीय प्रवास भावनिक शब्दांत आठवला. “समाजाच्या प्रश्नांसाठी मी सदैव तत्पर आहे,” असे आश्वासन देत नाईक यांनी खाटीक समाजाशी असलेले आपले जुने आणि घट्ट नाते व्यक्त केले. हाजी अरफात शेख यांनी आपल्या भाषणात संजीव नाईक यांच्यासोबतच्या विद्यार्थी सेनेच्या काळातील कार्याची आठवण करून दिली. त्यांनी समाजातील पूरग्रस्त मदतकार्य, सामाजिक ऐक्य आणि जनहितासाठी लढण्याच्या वृत्तीचे विशेष कौतुक केले.
मेळाव्यात समाजातील युवकांच्या शिक्षण, प्रगती व व्यवसाय वृद्धीसाठी ठोस प्रस्ताव मांडण्यात आले. समाजातील एकतेतून परिवर्तन घडविण्याचा नवा निर्धार या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केला. या प्रसंगी संस्थेच्या वतीने अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी लोकनेते गणेश नाईक यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आकाशकंदील आणि दिवाळी भेटवस्तू प्रदान केली. या शुभक्षणाने सभागृहात स्नेह, ऐक्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर “भारत माता की जय!” या घोषणांनी सभागृह राष्ट्रभक्तीने दुमदुमले.