भाईगिरीवर रॅप साँग बनवणाऱ्यांना अद्दल घडवली; आधी टक्कल केलं मग धिंड काढली!
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – गुंडगिरी आणि भाईगिरीची हवा अनेक तरुणांच्या डोक्यात जात आहे. भाई झाला म्हणजे सर्व काही कमवालं असा समज काही तरुणांचा झाला आहे. भाईगिरीतून धाक निर्माण करायचा हेच त्यांचे धेय आणि उद्दीष्ठ असते. त्यातून मग अनेक जण सोशल मीडियाचा आधार घेतात. आपला भाईगिरीचा रूबाब दाखवण्यासाठी रिल बनवतात. त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकीकडे प्रसिद्धी आणि दुसरीकडे भाईगिरीचा धाक निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. असाच एक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. मात्र नाशिक पोलीसांनी असा धाक दाखवणाऱ्या भाईलाच वठणीवर आणलं आहे. नाशिक शहराच्या गल्लीबोळातून एक नवीन आवाज घुमत होता. तो होता सोहेलच्या रॅप साँगचा. सोहेल त्याचा मित्र गौरव, आदित्य आणि इतरांना वाटायचं की गुंडगिरीचा रुबाब’ दाखवणारे रॅप साँग बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करावे. तसे केल्यास आपल्याला ‘पॉवर’ मिळवल्या सारखं होईल. त्याने तयार केलेल्या रॅप साँगमध्ये कायद्याची कसली ही भीती नव्हती. फक्त त्यात ‘दादागिरी’चा डंका होता. ही बाबत नाशिक पोलीसांच्या निदर्शनास आली.
गेले काही दिवस नाशिक पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारीच्या या ऑनलाइन आणि ऑफलाइन कारवायां विरोधात एक कठोर मोहीम हाती घेतली होती. केवळ रस्त्यावरच्या गुंडांनाच नव्हे, तर त्यांना हिरो बनवणाऱ्यांनाही धडा शिकवण्याचा निश्चय पोलीसांनी केला होता. रात्री सोहेल आणि त्याचे साथीदार किशोर आणि विनोदसह मुक्तिधाम परिसरात होते. नवीन रॅप साँगचा पुढचा भाग कसा बनवायचा, याची त्यांच्यात चर्चा सुरू होती. तितक्यात उपनगर पोलिसांचे पथकं तिथे धडकले. क्षणातच तिथे हिरोपणाची हवा विरून गेली. पाचही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी, पोलिसांनी जी कृती केली, ती त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरली.
या सर्वांना त्यांच्याच वस्तीतून, जिथे ते कालपर्यंत गुंडगिरीचे रॅप बनवत होते, त्याच रस्त्यावर त्यांची धिंड काढण्यात आली. लोकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. ज्या नजरांमध्ये कालपर्यंत ‘भिती’ होती आज त्या नजरांमध्ये प्रश्न आणि चीड होती. पोलिसांनी त्यांना एक घोषणा देण्यास भाग पाडलं. गौरव ज्याच्या रॅपमध्ये कायद्याला आव्हान देणारे शब्द होते, त्याला कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असे मोठ्याने ओरडायला लावलं. एका क्षणात सोहेलला जाणवलं की त्याने आणि त्याच्या मित्रांनी ज्या गोष्टीला पॉवर मानलं होतं, ती खरी पॉवर नव्हती.
खरी पॉवर कायद्यात, शिस्तीत आणि पोलीस यंत्रणेत होती . त्यांची ती गुंडगिरी फक्त एक क्षणिक भास होता. जो कायद्याच्या एका दणक्याने संपला. उपनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल आणि त्याच्या मित्रांनी आता ठरवलं की, जर कधी पुन्हा रॅप साँग बनवायचं झाल्यास, ते ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ याच विषयावर बनवतील. त्यांना दादागिरी नाही तर शिस्त आणि कायदा हीच खरी ताकद आहे, हे आता समाजाला त्यांच्या रॅपमधून सांगायचं होतं. नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं आहे. असा धडा पुढेही शिकवत राहा अशी मागणी ही केली आहे.