गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरुद्ध आणखी एक गुन्हा; मुंबईतील महिलेची जमीन बळकावून २५ लाखांची खंडणी मागितली
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – हडपसर परिसरात दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुंड टिपू उर्फ रिझवान सत्तार पठाण आणि त्याच्या टोळीने पुन्हा एकदा कायद्याला धाब्यावर बसवले आहे. सय्यदनगर भागातील एका महिलेला धमकावून तिची जमीन बळकावून घेतल्याचा आणि ती जमीन परत देण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी संबंधित ३१ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार टिपू पठाणसह सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेद गनी शेख, साजीद जिब्राईल नदाफ, इरफान नासीर शेख, अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख आणि मतीन हकीम सय्यद (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार महिला ही मूळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहे. तिच्या नावावर सय्यदनगर भागात एक जागा आहे. गुंड पठाण आणि त्याच्या साथीदारांनी या जागेवर बेकायदा पत्र्याचे शेड बांधून ताबा घेतला व ती जागा एका व्यक्तीला भाड्याने दिली. या भाड्यातून पठाण टोळी दरमहा पैसे वसूल करत होती.
महिलेने जेव्हा पठाण टोळीला जागेवरचा ताबा सोडण्यास सांगितले, तेव्हा पठाणने तिच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर काळेपडळ पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलिसांनी पठाण टोळीच्या घरांवर छापे टाकले आहेत.
या छाप्यात पोलिसांनी जमीन व्यवहारासंबंधी कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच, पठाण आणि त्याच्या साथीदारांची बँक खाती गोठवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पठाणने सय्यदनगर परिसरात केलेल्या बेकायदा बांधकामावर अलीकडेच महापालिका आणि काळेपडळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याचे कार्यालय व शेड पाडून टाकले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी टोळीच्या १० घरांवर छापा मारून चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हडपसरमधील सय्यदनगर परिसरात पठाणची दहशत मोठ्या प्रमाणात होती. त्याच्याविरुद्ध वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले आहेत. यापूर्वीही त्याने एका महिलेला धमकावून तिच्या जमिनीवर बेकायदा ताबा घेतला होता.
नागरिकांच्या तक्रारी असूनही, पठाणच्या दहशतीमुळे कोणीही पुढे येत नव्हते. अखेर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पठाण व त्याच्या १६ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
यानंतर पोलिसांनी पठाण टोळीला अटक करून तुरुंगात डांबले. दरम्यान, पठाण टोळीतील पसार साथीदार शाहरूक उर्फ हट्टी याचा मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता. टिपू पठाणविरुद्ध आणखी एक गंभीर गुन्हा नोंद