सोसायटीच्या सचिवाचे ‘लज्जा’ निर्माण होईल असे कृत्य; नवऱ्याने दाखल केली एफआईआर
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर परिसरात असलेल्या ‘अल्पाइन को-ऑप सोसायटी’च्या सचिवावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. विनोद वर्मा असं या सचिवाचे नाव असून त्याच्यावर सोसायटीतील एका महिला सदस्याचा विनयभंग केल्याचा आणि तिचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप करण्यात आल आहे. या महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विनोद वर्मा हा ३ वर्ष ‘अल्पाइन’ सोसायटीचा सचिव म्हणून काम पाहतो आहे, त्याच्यावर यापूर्वी २०२३ मध्येही सोसायटीतील एका महिलेचा व्हॉटसअपवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोप करण्यात येत आहे की वर्मा हा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने तो मनमानीपणे कारभार करत आहे. या सचिवाच्या कारभाराविरोधात सोसायटीतील अनेक सदस्यांनी निबंधकाकडे आणि पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निबंधकांनी सोसायटीमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी असे निर्देश दिले होते असा दावा करण्यात आला आहे.
विनोद वर्मा याच्यावर आरोप करण्यात आला आहे की सोसायटीचे पदाधिकाऱ्यांच्या ईमेल समूहामध्ये सोसायटीतील सदस्याच्या बायकोबद्दल मनात ‘लज्जा’ निर्माण होईल असे शब्द वापरले होते. हा ईमेल सोसायटीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जात असल्याने आपली बदनामी होत असल्याचे म्हणत या महिलेच्या नवऱ्याने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. वर्मा हा आपल्या पत्नीचा पाठलाग करताना आणि अश्लील हावभाव करतानाही दिसला होता असा आरोपही करण्यात आला आहे, मात्र याचा पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये उल्लेख नाहीये. टाईम्स ऑफ इंडियाने वादात सापडलेल्या वर्मा याच्याशी संपर्क साधला असता त्याने म्हटले की, हे आरोप खोटे असून सदर महिलेविरोधात मी कोर्टात खटला दाखल केला असल्याने तिने हे आरोप केले आहेत.