महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिंदे गटाला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Spread the love

महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिंदे गटाला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातू दुसऱ्या पक्षात अनेक पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीला बसला आहे, आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे यावेळी महाविकास आघाडीला नाही तर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनसेत प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा झटका मानला जात आहे.

शेवटी खऱ्या विचारांच्या मागे जनता उभी असते, थोडा वेळ लागतो पण सबर का फल मीठा होता है, जेव्हा लोकांना कळलं की दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काहीही होत नाही, नुसती आश्वासनाची खैरात आहे, तेव्हा आता इतर पक्षातून मनसेमध्ये लोक प्रवेश करत आहेत. उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येनं मनसेमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रामध्ये मनसेची ताकद काय आहे? ते लवकरच महापालिका निवडणुकींमधून दिसेल, संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम तयारी सुरू झालेली आहे, असं यावेळी अभ्यंकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रविवारी पुन्हा एकदा मनसेप्रमुख राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर गेले होते, ही गेल्या तीन महिन्यात दोन्ही ठाकरे बंधूंची सातवी भेट आहे. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. मात्र दुसरीकडे या युतीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात बिनसल्याचं चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon