सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल, प्रकाश लोंढे अटकेत; नाशिक पोलिसांचा गुंडगिरीवर निर्णायक वार!
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशिक शहरातील वाढत्या गुंडगिरी आणि गोळीबाराच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. गंगापूर आणि सातपूर परिसरात घडलेल्या दोन स्वतंत्र गोळीबार प्रकरणांमध्ये भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याच्यासह आरपीआय जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या कारवाईमुळे नाशिक गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.
गंगापूर गोळीबार प्रकरणात अजय बागुलसह सात जणांविरोधात गुन्हा
रामवाडी आणि गंगापूररोड परिसरात काही दिवसांपूर्वी सचिन साळुंखे याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी अजय बागुल, बॉबी गोवर्धने, विकी उर्फ वैभव, आणि इतर चार संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात या हल्ल्याचे सूत्रधार अजय बागुल असल्याचे उघड झाले असून, घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या आणि इतर संशयितांच्या शोधासाठी चार विशेष पथके तयार केली आहेत.
विशेष म्हणजे, संशयित विकी उर्फ वैभव याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल आहे, ज्यामुळे या घटनेमागे पूर्वनियोजनाचा संशय बळावला आहे.
सातपूर गोळीबारात प्रकाश लोंढे व मुलगा दीपक ताब्यात
दरम्यान, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (दि. ६) रात्री बिअर बारसमोर विजय तिवारी (२०) या तरुणावर भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला. या हल्ल्यात विजय तिवारीच्या मांडीत गोळी लागली असून, तो सध्या खासगी रुग्णालयात उपचाराधीन आहे.
या प्रकरणात याआधीच भूषण लोंढे याच्यासह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक ऊर्फ नानाजी लोंढे, तसेच संतोष पवार आणि अमोल पगारे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने सातपूर पोलिसांनी त्यांनाही सहआरोपी केले आहे.
या प्रकरणातील माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली असून, पोलिसांनी भूषण पाटील, दुर्गेश वाघमारे आणि आकाश डांगळे यांना अटक केली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
‘मोका’अंतर्गत कारवाईचा विचार
या दोन्ही गोळीबार प्रकरणांच्या गंभीरतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘मोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या फिर्यादीवरून खंडणीसाठी जीव घेण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक पोलिस ॲक्शन मोडवर
गेल्या नऊ महिन्यांत नाशिक शहरात तब्बल ४५ हून अधिक खुनाच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आता निर्णायक पावले उचलली असून, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे.
राजकीय पाठबळावर फोफावलेल्या गुंडगिरीला आता नाशिक पोलिसांनी लगाम घातला असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे.