डोंबिवलीतील पलावा सिटीमध्ये धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलांना मारहाण; सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – डोंबिवलीतील पलावा सिटी परिसरात असलेल्या कासाबेला गोल्ड सोसायटीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटीतील सुरक्षा रक्षकाने फुटबॉल खेळणाऱ्या अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सुरक्षा रक्षक राजेंद्र खंडारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
खेळणाऱ्या मुलांवर रक्षकाचा रोष
मुलं सोसायटीच्या परिसरात फुटबॉल खेळत असताना त्यांचा चेंडू इमारतीत गेला. यामुळे संतापलेल्या सुरक्षा रक्षक राजेंद्र खंडारे यांनी त्या मुलांना पकडून मारहाण केली. मुलांच्या म्हणण्यानुसार, रक्षकाने त्यांचे हात रुमालाने बांधून शिवीगाळ केली आणि धमकावले.
या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, सोसायटीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी संबंधित सुरक्षारक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांचा हस्तक्षेप
या प्रकरणी अल्पवयीन मुलांच्या पालकांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रक्षकाविरुद्ध शारीरिक अत्याचार आणि शिवीगाळ या कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी सांगितले की, “दोन्ही मुलांच्या पालकांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून आरोपी रक्षकाला ताब्यात घेऊन नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.”
गृहनिर्माण सोसायट्यांमधील सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांवर किंवा मुलांवर होणाऱ्या अशा अत्याचारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.