उंच इमारतीवरून पडलेल्या विटेने २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू; नोकरीसाठी घराबाहेर पडलेली संस्कृती अमिन ठरली मुंबईच्या बेफिकीर बांधकामाची बळी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मायानगरी मुंबईच्या उंच इमारतींच्या आड दडलेला धोकादायक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. जोगेश्वरी (पूर्व) परिसरात उंच निर्माणधीन इमारतीवरून सिमेंटची वीट खाली पडल्याने २२ वर्षीय संस्कृती अनिल अमिन या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संस्कृती ही नोकरीसाठी रोजप्रमाणे सकाळी घरातून बाहेर पडली होती. ती RBL बँक, गोरेगाव (प.) येथे गेल्या काही दिवसांपासून काम करत होती. मात्र, मजासवाडी परिसरातील बांधकामाधीन इमारतीजवळून जात असताना वरून सिमेंट ब्लॉक खाली कोसळून तिच्या डोक्यावर आदळला. या धक्क्याने ती जागीच कोसळली. स्थानिकांनी तत्काळ धाव घेत तिला रिक्षातून रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून ती आधीच मृत झाल्याचे घोषित केले.
घटनेनंतर मेघवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत या इमारतीवरील बांधकाम सुरू असताना सुरक्षेचे कोणतेही उपाय न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मृत संस्कृतीच्या वडिलांनी, अनिल उमेश अमिन (५६) यांनी याबाबत मेघवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,
> “माझी मुलगी संस्कृती रोजप्रमाणे नोकरीसाठी गेली होती. काही क्षणांतच बाहेरून ओरडण्याचा आवाज आला. मी धावत बाहेर गेलो, तर माझी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. उंचीवरून पांढऱ्या सिमेंटच्या विटेचा तुकडा तिच्या डोक्यावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.”
दरम्यान, या दुर्घटनेनंतर नागरिकांनी बांधकाम साइटवरील निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. “उंच इमारती बांधताना केवळ नफा पाहणाऱ्या बिल्डरांच्या बेफिकिरीमुळे निरपराध जीव जात आहेत,” अशी प्रतिक्रिया परिसरातील रहिवाशांनी दिली.
मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठेकेदार व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे.
संस्कृतीच्या आकस्मिक मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतीच करिअरची सुरुवात केलेली ही तरुणी मुंबईच्या निष्काळजी बांधकाम संस्कृतीची बळी ठरली आहे.