दाऊदला दणका! निकटवर्तीय सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कवर मुंबईत ८ ठिकाणी धाड

Spread the love

दाऊदला दणका! निकटवर्तीय सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कवर मुंबईत ८ ठिकाणी धाड

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने मुंबईतून पलायन करून अनेक दशके लोटली असली तरी विविध व्यक्तींच्या मार्फत दाऊदकडून मुंबईसह देशभरात काळ्या धंद्यांच्या माध्यमातून होणारी आर्थिक उलाढाल लपून राहिलेली नाही. अनेक अवैध व्यवसायांमध्ये दाऊदशी संबंधित व्यक्तींचा सहभाग आढळून आला आहे. ड्रग्ज रॅकेटमध्येही दाऊद इब्राहिमचे निकटवर्तीय म्हणून ओळखळले जाणारे अनेक अनेक कुख्यात गुन्हेगार सक्रिय आहेत. यातील एक असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सलीम डोला याच्या ड्रग्ज नेटवर्कवर बुधवारी सकाळी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापेमारी केली आहे. ईडीने मुंबईतील आठ ठिकाणी धाडी टाकत ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमच्या जवळचा असणारा सलीम डोलाच्या ड्रग नेटवर्कवर मुंबईत ईडीने धाड टाकली आहे. ईडीने बुधवारी सकाळी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत मुंबईतील आठ ठिकाणी धाडी टाकल्या. सलीम डोला याच्यासाठी काम करत असलेल्या फैसल जावेद शेख आणि अल्फिया फैसल शेख यांच्या मोठ्या ड्रग्ज तस्करी नेटवर्कमधून मिळवलेल्या अवैध पैशांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून ही कारवाई राबविण्यात आली.

ईडी सूत्रांनी सांगितले की, फैसल शेख हा कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोलाच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची खरेदी करत होता. सलीम डोला अनेक दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहे. त्याच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध नेटवर्कला पैसा पुरवण्याचे गंभीर आरोप आहेत. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो ने तर त्याच्या अटकेत मदत करणाऱ्या माहितीवर बक्षीसही जाहीर केलं आहे.

दरम्यान, दाऊद इब्राहिमचा जवळचा मानला जाणारा सलीम डोला हा एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आहे. देशात अनेक ठिकाणी पकडलेल्या ड्रग्जच्या रॅकेटचे धागे थेट सलीम डोलाशी जोडले गेलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी जून महिन्यात सलीम डोलाच्या मुलाला दुबईतून हद्दपार करण्यात आले होते. सलीम डोलाचा मुलगा ताहिर देखील या अवैध धंद्यात सक्रिय असल्याचं बोललं जाते. या पार्श्वभूमीवर ईडीकडून करण्यात येत असलेली कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात असून या माध्यमातून दाऊद इब्राहिम याच्याही आर्थिक नाड्या आवळण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon