बीडमध्ये शेतीच्या वादातून चार जणांकडून महिलेचा पाय तोडण्याचा प्रयत्न
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – एका धक्कादायक घटनेने बीड पुन्हा एकदा हादरले आहे. शेतीच्या वादातून थरकाप उडवणारी घटना समोर आली असून नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात भावकीतील चार जणांनी एका महिलेला निर्दयीपणे मारहाण करून तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केलाय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडिता आश्विनी येडे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. इतर महिलेला मारहाण करतानाचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. महिलांना अमानुष मारहाण करतानाचा हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असून बीड जिल्ह्यातील या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकरणाचा नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे कुटुंब मोठ्या दहशतीत असून संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून आरोपींना जेरबंद करा अशी मागणी केली आहे.