५०० रुपयांत शरीरसंबंधाचं आमिष; तरुणासोबत मुंबईत ३५ हजारांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : शारीरिक संबंधाचं आमिष दाखवून तरुणाला ब्लॅकमेल करून तब्बल ३५ हजारांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार गिरगाव परिसरात घडला आहे. या प्रकरणी व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण सीएसएमटी स्थानकात असताना एका अनोळखी महिलेने त्याच्याशी संवाद साधत ५०० रुपयांत शरीरसंबंधाची डील ठरवली. त्यानंतर त्या महिलेनं तरुणाला टॅक्सीने पठ्ठे बापूराव मार्गावरील भारत भवन हॉटेलजवळील इमारतीत नेलं. पहिल्या मजल्यावरील खोलीत पोहोचल्यावर तिच्यासोबत आणखी तीन महिला आल्या. चौघींनी मिळून तरुणाला धमकावत त्याचे अश्लील व्हिडिओ शूट केले आणि बदनामीची भीती दाखवत पैशांची जबरदस्ती वसुली केली.
या महिलांनी तरुणाच्या मोबाईलमधून २२ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले, तर १३ हजार रुपये रोख स्वरूपात हिसकावले. घटनेनंतर पीडित तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन महिलांना ताब्यात घेतलं असून एकीचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे माजिदा नूर सरदार गाझी, रुपा विश्वनाथ दास आणि नसिम्मा जमान शेख अशी आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास व्ही. पी. रोड पोलिस करत आहेत.