सोने दुप्पट करण्याचे आमिष; महिलेकडून ८ लाखांची फसवणूक, वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई – अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवून महिलेकडून ८ लाख ५५ हजार रुपयांचे सोने लाटल्याचा प्रकार वाशीत उघडकीस आला आहे. “मी देवाचा भक्त आहे, मला सोने दुप्पट करण्याची कला अवगत आहे,” अशी थाप मारून उरणमधील दीपक पाटील (रा. आदिवासी वाडी, उरण) या व्यक्तीने महिलेला फसवले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला वाशी येथे राहते. आरोपी पाटील याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधला. धार्मिक भाषा वापरत सतत देवभक्तीचे दाखले देत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर “मी देवाच्या कृपेने सोने दुप्पट करून देऊ शकतो” असा दावा करून सोन्याचे दागिने मागवले.
फिर्यादीने त्याच्या बोलण्याला भुलून १७ ऑक्टोबर २०२३ ते १ ऑक्टोबर २०२५ दरम्यान एकूण ८ लाख ५५ हजार रुपयांचे दागिने दिले. यात २ लाख ७० हजार किमतीच्या ३ तोळ्यांच्या बांगड्या, ४ लाख ६० हजार किमतीचा ५ तोळ्यांचा राणी हार, तसेच सव्वा लाखाचे कानातील (दीड तोळे वजनाचे) दागिने यांचा समावेश आहे. मात्र, आरोपीने दागिने परत केले नाहीत आणि सोने दुप्पट करण्याचे आश्वासनही पूर्ण केले नाही.
वारंवार मागणी करूनही दागिने परत न मिळाल्याने फिर्यादीने अखेर वाशी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दीपक पाटील याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालून ‘सोने दुप्पट’ अशा थापा मारून लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच असल्याचे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.