डोंबिवलीत गायकवाड वाडीत बेकायदा बंगला उभारणाऱ्या भूमाफियांवर फौजदारी गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील मौजे नवागाव महसुली हद्दीतील गायकवाड वाडीत दोन भावांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परवानग्या न घेता उभारलेल्या बेकायदा बंगल्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ह प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या पुढाकाराने अधीक्षक अर्जुन वाघमारे यांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात नितीन नामदेव गायकवाड आणि विश्वनाथ नामदेव गायकवाड या दोघांविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना आणि नियोजन अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका ‘ह’ प्रभागात अनधिकृत बांधकामांविरोधात मोठ्या प्रमाणात मोहिम सुरू आहे. कुंभारखाणपाडा भागातील ‘साई रेसिडेन्सी’ तसेच ठाकुरवाडीतील ‘साईतीर्थ’ या इमारतींना अनधिकृत घोषित करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आता गायकवाड वाडीत उभारलेला बंगला या मोहिमेच्या जाळ्यात अडकला आहे.
पालिकेच्या तक्रारीनुसार, गायकवाड बंधूंनी सर्व्हे क्र. २३३-३ वर बेकायदा बंगला बांधला. पालिकेने त्यांना बांधकामाचे अधिकृत कागदपत्र दाखल करण्यास व सुनावणीसाठी हजर राहण्यास नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, दिलेल्या अवधीमध्ये त्यांनी ना सुनावणीस हजेरी लावली, ना कागदपत्रे दाखल केली. परिणामी, पालिकेने हे बांधकाम अनधिकृत ठरवून १५ दिवसांत पाडण्याचे आदेश दिले. तरीसुद्धा त्यांनी पालिकेच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
या बंगल्यात रहिवास दाखविण्यात आल्याने कारवाईत अडथळा निर्माण होतो, असेही तक्रारीत नमूद केले आहे. अनेक भूमाफिया बेकायदा बांधकामांचे संरक्षण करण्यासाठी हा डावपेच वापरत असल्याचे प्रशासनाचे निरीक्षण आहे.
पालिका अधीक्षक वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी दोन्ही भावांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.