दसऱ्यामुळं ट्रॅ्क्टर धुवायला गेले, गंगापूरमधील तलावात ४ मुले बुडाली; गावावर शोककळा
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे अंत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका तलावात बुडून चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दसऱ्याच्या निमित्ताने सर्व मुले ट्रॅक्टर धुण्यासाठी लिंबेजळगाव तलावातील बॅकवॉटरमध्ये गेले होते, यावेळी एकापाठोपाठ एक असे चारही मुले पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुर्घटनेत बुडालेली ही सर्व मुले ९ ते १७ वर्षांमधील होती, या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे.
व्यंकटेश दत्तात्रय तारक (११), इरफान इसाक शेख (१७), इम्रान इसाक शेख (१२) आणि जैनखान हयात खान पठाण (९) अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने व मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दसऱ्याच्या सणादिवशीच मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांना पूर आला आहे. तर, नदी, नाले, ओढे आणि तलावही भरुन वाहत आहेत. त्यामुळेच, वाहत्या पाण्यात जाऊ नका, पाण्यशी खेळू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच, सोशल मीडियातून देखील असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.