उल्हासनगरमध्ये नवरात्रोत्सवात दहशत; शाखाप्रमुखावर बंदूक रोखून हवेत गोळीबार, पिता–पुत्राला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – नवरात्रोत्सवाच्या आनंदाला धक्का बसवणारी धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. कॅम्प क्रमांक २ मधील गरबा कार्यक्रमादरम्यान एका सराईत गुन्हेगाराने शिवसेना शाखाप्रमुखावर बंदूक रोखत हवेत गोळीबार केला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपी पिता–पुत्राला अटक केली आहे.
मंगळवारी रात्री २४ नंबर शाळेजवळील बंजारा विकास परिषदेसमोरील मैदानात बालाजी मित्र मंडळ आणि शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्या पुढाकाराने गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र साडेअकरा वाजताच्या सुमारास सोहम पवार नावाचा स्थानिक गुन्हेगार अचानक कार्यक्रमस्थळी दाखल झाला. “मी इकडचा भाई आहे, गरब्याची परवानगी माझ्याकडून घेतली का?” असा दम भरत त्याने थेट बाळा भगुरे यांच्यावर बंदूक रोखली.
परिस्थिती गंभीर होताच भगुरे यांच्या भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु दहशत निर्माण करण्यासाठी सोहमने हवेत दोन गोळ्या झाडल्या. त्याच्यासोबत त्याचे वडील अनिल पवारदेखील उभे राहून धमकावण्यात सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवत बाळा भगुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.
बुधवारी पोलिसांनी वेगाने कारवाई करत कॅम्प क्रमांक ४ मधून आरोपी सोहम पवार (१९) आणि त्याचे वडील अनिल पवार या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तुलही जप्त करण्यात आले आहे.
या घटनेमुळे नवरात्रोत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरले असून, परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.